सुमधुर मधुराणी

  


व्हॉटसॅप वर आलेली ही इमेज पाहून मला माझ्या BSc लास्ट इअर ला शिकलेला अभ्यासक्रम आठवला.त्यात मधमाशीचे जीवनचक्र असा एक धडा होता. त्यावरून थोडं लिहावंसं वाटलं. 

भारतात मधाचे महत्त्व प्राचीन काळा पासून आहे.. मधमाशी आणि मानव यांचा सबंध जवळ जवळ ४००० वर्षा पूर्वी आला असावा; वेदकालीन वाङ्मयात व इतर धार्मिक ग्रंथात मधाचा उल्लेख आढळतो. भोपाळ मधील काही गुहांमध्ये जी शैलचित्र आहेत त्यांतही मधमाश्यानची चित्रं आहेत. 

सगळ्यात पहिला गोड पदार्थ म्हणजे मध; साखर अन गूळ या नंतर माहिती झाले. अगदी तान्ह्या बाळाचे उष्टावळ करतानाही सोन्याच्या अंगठीतुन मध चाटवुन केले जाते. 

भारतात मधमाश्यांनच्या ३ जाती आहेत

 १. एपीसडॉरसटा डोंगर माशी किंवा आग्या माशी ही जात इमारती किंवा झाडांवर पोळ तयार करते. या माश्या चिडखोर स्वभावाच्या असतात. खूप मध जमा करतात आणि ऋतू प्रमाणे जागा बदलत असतात. 

२. एपिस इंडिका या उंचावर आढळतात. गुहा, झाडांच्या ढोल्या, कपारी, खडकात या माश्या सर्वाधिक मध गोळा करतात. एक पोळ्यात  साधारणपणे २.५ ते ७ किलो मध असते. डोंगराळ भागातील पोळ्यातून ३.५ ते १३ किलो मध मिळते. हिमाचल प्रदेशातील कुलू खोऱ्यात ही जात दिसते. आर्थिकदृष्ट्या ह्या जातीच्या मधमाश्यांना उपयोगात आणले जाते. 

३. एपिस फ्लोरिया ही लहान जात आहे. यांची पोळी एकटीच असतात, आर्थिकदृष्ट्या उपयोगी नसतात. बंगाल, आसाम, तामिळनाडू याठिकाणी ही जात आढळून येते. 



मधमाशी हा सामाजिक कीटक म्हणून ओळखला जातो. या माश्या समूहात रहातात; त्यांची वसाहत असते. मधमाश्यांन पासून मुख्यत्त्वे मधाचे अन मेणाचे उत्पादन होते तसेच अतिशय महत्वाचे म्हणजे परागीकरण  (Pollination) मोठ्या प्रमाणात होते. कारण मधमाशी ही पुष्पनिष्ठ असते; म्हणजे एकदा एका ठिकाणी जाऊन मध गोळा केले आणि त्यांना कल्पना आली की या ठिकाणी जास्त मुबलक प्रमाणात फुले आहेत; त्या ठिकाणी अनेकदा जाऊन मध गोळा करतात. 

ईश्वराची अन निसर्गाची किमया किती सुंदर आहे की ज्या फुलांवर मकरंद गोळा करण्यासाठी मधमाशी व इतर कीटक येतात त्या फुलांची रचनाहि अशीच केलेली असते जेणे करून त्यातील परागकण या कीटकांच्या पंखांवर पडतील आणि त्यांचे परागीकरण होईल. 

प्रत्येक मोहोळात एकच राणी माशी असते. वजनाने आणि आकाराने इतर माश्यां पेक्षा मोठी असते. साधारणपणे ५वर्ष जगते, प्रतिदिन २००० अंडी देते,पूर्ण कार्यकाळात जवळपास १५लाख अंडी देते. 

प्रत्येक मोहोळात  साधारण १०० नर माश्या असतात ते फक्त राणी माशी सोबत संभोग करून मरतात. 

श्रमिक माश्या साधारणपणे ७००० ते ९००० असतात किंवा त्याही पेक्षा जास्त असतात. २-४ महिनेच जिवंत राहतात; वय बदलले की त्यांची कार्य बदलतात. यातील काही शोधकार्य आणि सर्वेक्षण करतात, काही मध गोळा करतात, काही स्वछता करण्यासाठी असतात, काही सैनिक माश्या असतात ज्या पोळ्याचे संरक्षण करतात. राणीमाशीचे ५०  अंगरक्षक ही असतात. ते राणी माशीचे पोषण, संरक्षण, स्वच्छते साठी कार्य करीत असतात.

मधमाश्यांना अंगावर बारीक केस असतात; फुलांतील मध गोळा करताना त्यावरील परागकण या केसांत अडकून त्याचे परागीकरण होण्यास मदत होते. मुखावरील रुचि-इंद्रियांद्वारे मधमाशीला एखादा द्रव गोड, अम्‍लीय, क्षारीय (अल्कलाइन) आहे हे समजते. प्रकाश व अंध:कार यांत भेद करू शकते, तर संयुक्त नेत्रांनी ती रंग, आकार आणि रूप यांच्यातील फरक ओळखू शकते.  संयुक्त नेत्राद्वारे वस्तूचे संकलित चित्र मिळत असल्याने मधमाशीला गतिमान वस्तूंचे ज्ञान सहजतेने होते. तिला कालाची जाणीव व स्मरणशक्ती  असल्याने ती एखाद्या शेतातील विशिष्ट क्षेत्रात दिवसामागून दिवस योग्य वेळी पुन:पुन्हा परतताना आढळते.तसेच कामकरी मधमाश्या मकरंद मिळण्याचे ठिकाण सापडल्यावर इतर कामकरी मधमाश्यांना ते ठिकाण, त्याची दिशा, अंतर व तेथे मिळणाऱ्या मकरंदाचा अंदाज यांविषयी माहिती देण्यासाठी जी विशिष्ट प्रकारची हालचाल (नृत्य) करतात. 



मधमाश्या मेणाच्या पत्र्या किंवा फण्या तयार करतात व या फण्यांत त्यांची अंडी व अळ्या (Larva ) राहू शकतील अशा आकाराच्या कोशाची रचना करतात. नंतर या फण्या झाडांच्या ढोल्यांत, गुहेत, भिंतीच्या पोकळीत किंवा कृत्रिम पोळ्यात चिकटविल्या जातात. अळ्यांना नियमित अन्नपुरवठा केला जातो व त्याची योग्य अवस्थेपर्यंत वाढ झाली की, कोशावर मेणाचे किंवा रेशमी तंतूचे आवरण घातले जाते.

या समूहातील प्रौढ व पूर्ण वाढ झालेल्या मधमाश्यांचे त्यांच्या कार्यानुरूप वर्गीकरण करता येईल. राणीमाशी ही समूहातील सर्वांत महत्त्वाचा घटक आहे. प्रत्येक समूहात एक राणीमाशी असते व त्या समूहाचे मातृत्व तिच्याकडे असते. ही  राणीमाशी जननक्षम असून सदैव फलित अंडी घालीत राहते व त्यामुळे समूहांची संख्या वाढत राहते. 

या अंड्यांपासून निर्माण झालेल्या अळी स कामकरी माश्यांकडून राजरस (विशेष प्रभावी चिकटसर आहारद्रव्य रॉयल जेली) मिळाला की, या अळीचे रूपांतर जननक्षम अशा राणीमाशीत होते. हा रस म्हणजे कामकरी माश्यांच्या जिव्हाग्रंथीपासून (मुखाच्या तळापासून निघणाऱ्या जिभेसारख्या मध्यस्थित रचनेच्या खाली असलेल्या ग्रंथीपासून) निर्माण होणारा स्राव असतो. राणी माशीस काटेरी नांगी असते; तिचा उपयोग दुसऱ्या राणीमाशीस  मारण्यास केला जातो.  मधमाश्यांची राणीमाशी १५ ते २० मिमी. लांब असते

कामकरी माश्या हा समूहाचा दुसरा घटक होय. या माश्या वांझ असतात. एका समूहात यांची संख्या खूपच म्हणजे शेकडा ९९ पेक्षाही जास्त असते. मधमाश्यांचा समूह २० ते ५० हजार माश्यांचा असू शकतो. कामकरी माश्या फलित अंड्यांपासून निर्माण होतात. कामकरी माश्या राणी माशीने घातलेली अंडी मेणाने बनवलेल्या कोठड्यामध्ये ठेवतात. कोठड्या बनविण्याचे काम कामकरी माश्यांचे असते. एका कोठडीत एकच अंडे ठेवले जाते. कामकरी माश्या आणि राणी माशी फलित अंड्यांपासून तर नर अफलित अंड्यांमधून निपजतात. नर एकगुणित गुणसूत्राचे, तर राणी आणि कामकरी माशा द्विगुणित गुणसूत्रांच्या असतात. अंड्यातून बाहेर पड्लेल्या अळ्याना कामकरी माश्या प्रारंभी रॉयल जेली खायला घालतात. नंतरच्या काळात अंळ्याना फक्त मध आणि परागकण खायला घातले जातात. ज्या अळीला फक्त रॉयल जेलीच्या खाद्यावर ठेवलेले असते त्यापासून राणी माशी तयार होते. अनेक वेळा कात टाकल्यानंतर अळी स्वतःभोवती कोश तयार करते.

कामकरी माश्यांच्या कार्याच्या विभागणीचा विस्तृत अभ्यास झालेला आहे. नव्या कामकरी माश्या पोळे स्वच्छ ठेवण्याचे आणि अंड्यांतून बाहेर आलेल्या अळ्याना खायला घालण्याचे काम करतात. नव्या कामकरी माश्यांच्या शरीरात असलेल्या ग्रंथीनी रॉयल जेली बनविण्याचे काम थांबविल्यानंतर त्या पोळ्यामधील नव्या कोठड्या बांधण्यास मेण तयार करतात. कामकरी माश्या या व्यतिरिक्त इतर अनेक काम करीत असतात जसे की फुलांचे आणि जागेचे सर्वेक्षण करणे, मध गोळा करून संग्रहित ठेवणे. पाणी पुरवठा ठेवणे, पोळे स्वच्छ ठेवणे तसेच त्याचे तापमान सांभाळणे यासाठी काही माश्या पोळ्याच्या बाहेर घोंगावत असतात. सर्वेक्षण करणाऱ्या माश्या; मध गोळा करण्यास जाणाऱ्या माश्यांना नृत्य करून दिशा देण्याचे काम करतात. मधमाश्या त्यांचे पोळे प्रदूषण असलेल्या जागी बांधत नाहीत तसेच त्या शुद्ध पाणीच पितात. मधमाश्याचे पोळे नॉर्थ-साऊथ दिशेला बांधलेलं असते. 


मधमाश्यांना काही नैसर्गिक धोक्यांना सामोरे जावे लागते जसे कि काही जन पोळे नष्ट करण्यासाठी धूर करतात व ती जाळून टाकतात, झ्ज्या झाडांवर पोळे असते ते झाड तोडले जाते, या माश्यांना रोग सुद्धा होतात. शावेली कृत्रिम रित्या मधमाशांचे संगोपन केले जाते आणि त्या शेतीला Apiculture असे संबोधले जाते.

फुलांच्या परागकणांची मधमाश्यांच्या लाळेशी प्रक्रिया होऊन मध तयार होतो. मध हा नैसर्गिकपणे मिळत असलातरी ज्या पोळ्यांत हा जंगली मध तयार होतो, तेथून तो काढून जमा करणे अवघड असते. त्यामुळे मधुमक्षिका पालन केंद्रांत मधमाश्यांना लाकडी खोक्यांमध्ये मधाची पोळी बांधू द्यायला उद्युक्त केले जाते, आणि त्या पोळ्यांतून नियमितपणे मध गोळा करता येतो. मधात जो गोडवा असतो तो मुख्यतः ग्लूकोज़ आणि एकलशर्करा फ्रक्टोज मुळे असते. मधाचा प्रयोग औषधि रूपात ही होताे. यात ग्लूकोज व अन्य शर्करा तसेच विटामिन, खनिज आणि अमीनो अम्ल पण असतात ज्यात अनेक पौष्टिक तत्व मिळतात. अस्सल मध चाखल्यानंतर जिभेवर त्या मधाचा गोडवा फक्त पंधरा सेकंदात नष्ट होतो, तर साखरेचा पाक अथवा कृत्रिम मध यांचा जिभेवरील गोडवा पंधरा मिनिटे टिकून राहतो.

मधमाशा हा मध जांभूळ, ओवा, करंज, कारवी, निलगिरी, मोहरी, लिची, शेवगा, सूर्यफूल, हिरडा-गेळा, ओमरेंदा इत्यादी वनस्पतींच्या फुलोर्‍यांतून गोळा करतात. महाबळेश्वरात यांपैकी जांभळाचा मध विपुल प्रमाणात मिळतो. चाफा, जाई, जुई, मोगरा, कमळ, गुलाब ही काही फुलं आहेत


ओमरेंदा मध महाराष्ट्र व कोयनेचे जंगल परिसरातून गोळा केला जातो. हा रंगाने पिवळसर आहे, तर मधाची चव स्वादिष्ट आहे.

करंजाचा मध महाराष्ट्र आणि बिहार या राज्यांतून गोळा केला जातो. रंग मध्यम असून, मधाची चव कडवट व विशिष्ट आहे.

जांभळाचा मध हा सह्याद्रीच्या जंगलांत अधिक प्रमाणात गोळा केला जातो. रंगाने हा मध गडद, तर चवीने कडवट असतो. मधुमेह रुग्णांसाठी हा उत्तम शक्तिवर्धक मध आहे.

निलगिरीचा मध निलगिरीच्या जंगलात गोळा केला जातो. मधाचा रंग गडद असून, चव मात्र विशिष्ट असते. सर्दी-खोकला व दम्यासाठी हा मध उपयोगी पडतो. 

एक किलो मध गोळा करण्यासाठी एका मधमाशीला साधारणपणे दहा लाख times मकरंद जमा करावा लागतो. 

मेण: ठरावीक वयाच्या कामकरी माश्यांच्या पोटावरील खंडामधून मेण तयार होते. या मेणाचा पोळ्यामध्ये नव्या कोठड्या तयार करणे, ज्या कोठड्यामध्ये अंडी साठवून ठेवली आहेत त्यांची तोंडे बंद करणे आणि पोळ्याची दुरुस्ती करणे यासाठी होतो. मेणापासून सौंदर्यप्रसाधने बनविली जातात. 

आयुर्वेदानुसार मधाचे आठ प्रकार आहेत - माक्षिक, भ्रामर, क्षौद्र, पौतिक, छात्र, आर्ध्य, औद्दालिक, दाल

मधाच्या एका नमून्याचे विश्लेषण 

फ्रक्टोज़: ३८.२% ग्लूकोज़: ३१.३% सकरोज़: १.३% माल्टोज़: ७.१% जल: १७.२% उच्च शर्करा:१.५% भस्म: ०.२% अन्य/अज्ञात: ३.२% 



मधाचे अनेक गुणधर्म आहेत जसे 

स्वास्थ्य व सौंदर्य चांगलं रहावं यासाठी मध गुणकारी आहे. पोटाचे विकार, चरबी कमी करण्यासाठी, सर्दी-खोकला, दमा, रक्तदाब, रक्तशुद्धि तसेच लाल रक्त पेशी वाढविण्यासाठी मध गुणकारी असते. मधात अँटिबायोटिक व अँटिटॉक्सिक गुणधर्म असतात. मधात Moisturizing, Lightning आणि Anti-ageing गुणधर्म असतात त्यामुळे  त्वचेचे सौंदर्या सुधारण्यासाठीही याचा उपयोग होतो.

मध व्हिटॅमिन्सनी परिपूर्ण असते त्यात बी१२, बी २,३,५,६,९, आणि व्हिटॅमिन सी तसेच मिनरल्सहि असतात जसे की लोह, कॅल्शियम, पोटॅशियम, सोडियम, झिंक, फॉस्फरस, मॅग्नेशियम. 

२० मे हा दिवस जागतिक मधमाशी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. 

मधमाश्यांच्या संवर्धनासाठी कार्यरत संस्था आहेत. 

 १. मधमाशी प्रशिक्षण केंद्र महाबळेश्वर 

२. केंद्रीय मधमाशी संशोधन व प्रशिक्षण केंद्र, पुणे 

३. कृषी विज्ञान केंद्र बारामती 

४. कृषी विद्यापीठ, अन्य कृषी विज्ञान केंद्र सामाजिक संस्था. 

असे हे मधमाशीचे जीवनचक्र, त्यांच्या पासून मिळणारे मध आणि मेण यांचे उपयोग आणि मला सर्वात भावलेले ते म्हणजे त्यांची कार्यनिष्ठा; अतिशय मेहनती असतात आणि त्यांच्या कामात सातत्य असते. एकत्र राहणे आणि नेमून दिलेली काम व्यवस्थित पार पाडणे हे त्यांच्या जीवन शैलीतील महत्वाचा पैलू आहे. 

अशीच कार्यक्षमता अन सातत्य आपल्यात यावे. एकत्रितपणे अन एकजुटीने आपणही काम करावे. प्रत्येकाच्या नेमून दिलेल्या कामाला एकमेकांनी सहाय्य  करावे. आपण ज्या जागी रहातो ती जागा प्रदूषण विरहित असली पाहिजे याची दक्षता घेतली पाहिजे. आपण जे पाणी पितो ते शुद्ध आहे का हे पहिले पाहिजे. आपल्या मुळे काहीना काही सामाजिक कार्य घडावे हि इच्छा मनात कायम तेवत असली पाहिजे.  



11 comments:

  1. खूपच अभ्यासपूर्ण लेख. मध आणि मधमाशी याबद्दल संपूर्ण माहिती मिळाली. धन्यवाद

    ReplyDelete
  2. धन्यवाद विशाल सर

    ReplyDelete
  3. ,👍👌माहिती आहे ही

    ReplyDelete
  4. अभ्यासपूर्ण विस्तृत लेख.पण त्याचबरोबर सहज साधे सोपे शब्द.
    आभार

    ReplyDelete
  5. वाह अत्यंत विस्तृत, अभ्यासपूर्वक, उपयुक्त लेख...

    ReplyDelete
  6. खुप छान लेख व उपयुक्त माहिती
    धन्यवाद

    ReplyDelete
  7. वा खुपच छान माहीती

    ReplyDelete
  8. वा खुपच छान माहीती

    ReplyDelete

संत गाडगेबाबा

  संत गाडगेबाबा हा धडा शाळेतल्या पुस्तकात होता. पण माझ्या त्यांच्या विषयीची आस्था किंवा आपुलकी माझ्या घरापासून सुरु होते. गाडगेबाबाच्या आठवण...